धक्कादायक: MPSC च्या क्लासला जाणार्‍या 26 वर्षीय विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आल्याची घटना ताजी असतानाचा, हडपसर येथे MPSC च्या क्लासला जाणार्‍या 26 वर्षीय विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (८४५/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम संभाजी गरुड (वय २२, रा. ढमाळवाडी, हडपसर) आणि हर्षद मारुती कुंजीर (वय २२, रा. पापडे वस्ती, हडपसर) यांच्यावर विनयभंगाचा  गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाला असून त्या सध्या एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत. त्यासाठी त्या भेकराईनगर येथील एका अभ्यासिकेत जातात. तेथे जात असताना आरोपी हे त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्यांची आणखी हिंमत वाढून ते त्यांच्या जवळून जाऊन त्यांच्या अंगाला स्पर्श करुन येण्या जाण्याच्या मार्गात उभे रहात.

१३ सप्टेंबर रोजी भर दुपारी साडेचार वाजता या दोघा टोळ भैरवांनी त्यांचा रस्ता आडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल नंबर घेतला. तसेच त्यांना फोनवर बोलल्या नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकाराने त्या घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी ही हकीकत घरी सांगितली. पती व दीराने धीर दिल्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

महिला सुरक्षेचे धिंडवडे

महाराष्ट्र गेल्या काही दिवसांमधल्या महिलांवरील अमानुष अत्याचारांनी हादरून गेला आहे. मुंबई, पुणे, कल्याण, वसई, अमरावती, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर.. अशा सगळ्या ठिकाणांहून बलात्काराच्या घटनांच्या संतापजनक बातम्या येत आहेत. या अत्याचारांना बळी पडलेल्या अल्पवयीन मुली आहेत. प्रवासातल्या तरुणी आहेत. गृहिणी आहेत आणि घर सोडलेल्या युवतीही आहेत. मुंबईत साकीनाका परिसरात पहाटे अत्याचार करून या पीडित महिलेचा क्रूरपणे खून करण्याची घटना तर अंगावर शहारे आणणारी आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे अजून काय निघायचे राहिले आहेत? या नृशंस गुन्ह्यांची नैतिक जबाबदारी घेण्यास सत्ताधारी आघाडीतील तीन पक्षांचे नेते, मंत्री, नोकरशहा किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारी यातले कुणीही पुढे येणार नाही.

याचे कारण त्यांचे प्राधान्यक्रमच वेगळे आहेत आणि त्यात महाराष्ट्रातील महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा येत नाही. काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशनवर मदतीची तयारी दाखवून अपहरण केलेल्या युवतीवर दोन दिवसांमध्ये बारा-तेरा जणांनी अत्याचार केल्याचे समोर येते आहे. पोलिसांना एक मुलगी स्टेशनवरून दोन दोन दिवस गायब झाल्याचे समजूही नये, इतके पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे विसविशीत झाले आहे का? कायद्याचे राज्य ही अमूर्त संकल्पना असते. कायद्याचे राखणदार अशा पोलिसांनी ती प्रत्यक्षात आणायची असते. संभाव्य गुन्हेगारांना वाटणारी पोलिसांची भीती आणि दहशत ही गुन्हे रोखणारी खरी शक्ती असते. पोलिसांची अशी थोडी जरी भीती मनाच्या तळात असती तरी साकीनाका परिसरात पहाटे अत्याचार करून या महिलेचे निर्घृणपणे प्राण घेण्यास हा नराधम धजला नसता.