माझ्या चिखली मतदारसंघाच्या विकासाचा आलेख चढता ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील – आमदार श्वेता महाले

चिखली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने संबंध देशामध्ये सुरू असलेल्या मोदी @ ९ अभियानांतर्गत ‘घर घर चलो’ उपक्रमाच्या अनुषंगाने चिखली विधानसभेच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी चिखली शहरातील प्रभाग क्र. ७ मध्ये भेट दिली.

यावेळी आमदार महाले यांनी केंद्र सरकारद्वारे राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देत चिखली शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देणारे पत्रक नागरिकांना वितरित केले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्याशी विविध सामाजिक, राजकीय विषयांवर संवाद साधला तसेच प्रभागातील दलीत वस्ती मध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याचे निवारण करण्याबाबत आश्वस्त केले.

महाले म्हणाल्या कि चिखली शहरात सुरू असलेली एकंदर विकास कामे पाहता नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजना तसेच विकासकामांमुळे लोक प्रभावित आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता प्रत्यक्षात मार्गी लागत आहेत. माझ्या चिखली मतदारसंघाच्या विकासाचा आलेख चढता ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे हि त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासह शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कालच चिखली मतदारसंघातील मौजे सोमठाणा येथे १ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना किंमत १ कोटी २४ लक्ष रुपये, २५१५ निधीतुन सिमेंट रस्त्याचे लोकार्पण किंमत ६ लक्ष रुपये, जिल्हा वार्षिक योजना निधीतून येथील शाळा दुरुस्तीचे भूमिपूजन किंमत २ लक्ष ८० हजार रुपये, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत सोमठाणा येथे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काम किंमत ४ लक्ष १२ हजार रुपये आदी विकासकामांचा समावेश आहे.