२०२४ लोकसभा निवडणुकीतील पराभव आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवळ दिसू लागला आहे – विजय वडेट्टीवार

गोंदिया : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यावर विजय वडेट्टीवार यांचा पहिला विदर्भ दौरा सुरु असून नागपूर विमानतळावर मोठ्या उत्साहात त्यांचे काँग्रेस कार्यकर्ते – पदाधिकारी यांच्याकडून स्वागत करण्यात आले. लोकसभा निहाय मतदार संघाचा आढावा घेण्याचे काम या दौऱ्यादरम्यान वडेट्टीवार करणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमेटी मार्फत आयोजित बैठक काल पार पडली.
या बैठकीमध्ये सदर क्षेत्रातील समस्या, केंद्र व राज्य सरकार द्वारा दुर्लक्षित करण्यात आलेले प्रकल्प याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आढावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला. तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आजचा दौरा महत्वाचा होता. पदाधिकाऱ्यांसह चर्चा करुन बूथ कमिट्या, आघाड्यांची माहिती जाणून घेतली.
विशेष म्हणजे या बैठकीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. काँग्रेससाठी या मतदारसंघात अनुकुल वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार व राज्यसरकार वर निशाणा साधला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीतील पराभव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळ दिसू लागला आहे. स्वतःचे जहाज बुडत असल्याची त्यांना जाणीव झाली असून इतर राजकीय पक्ष फोडत आहे. मात्र त्यांनी कितीही तोडफोड केली तरी त्यांचा पराभव निश्चित आहे अशी जळजळीत टीका वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा २०२४ मध्ये पूर्ण ताकदीने इंडिया साठी काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच बूथ पातळीवर कार्यकर्त्यांनी कसे काम करायला हवे याबाबत मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, प्रदेश महासचिव नामदेव किरसान, पी.जी.कटरे, किसान काँग्रेसचे जितेश राणे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे, पदाधिकारी यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ, युवा व महिला कार्यकर्ता उपस्थित होते.