रायगडमध्ये ‘यांना’ मिळणार १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान, वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेचा तोडगा

मुंबई : यंदा संपूर्ण भारत देश ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सामील होऊन, खाते वाटप होऊन बराच काळ उलटूनही अजून अनेक मंत्र्यांना पालक मंत्री म्हणून जवाबदारी देण्यात आलेली नाही. यामुळे यंदा स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण कोण करणार ? या बाबत तर्क वितर्क लावले जात असताना शिंदे – फडणवीस – पवार यांच्या त्रिशूल सरकारने यावर उद्भवणारे वाद टाळण्यासाठी जालीम तोडगा काढला आहे.

राज्य सरकार कडून याबाबत कोणते मंत्री कोठे झेंडा वंदन करणार याबाबत माहिती देण्यातआली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला तर फडणवीस नागपूर येथे उपस्थित राहणार आहेत. यादीमध्ये अनेक ठिकाणी सध्याचे पालकमंत्री आणि ध्वजारोहणाचा जिल्हा यामध्ये बदल करण्यात आला आहे.

रायगडसाठी तोडगा

पालकमंत्री पदाच्या शर्यतीसाठी चर्चेत असलेला रायगड जिल्हा मात्र या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे ध्वजारोहण कोण करणार ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण विशेष म्हणजे यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यांचे झेंडावंदन संबंधित जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांना यंदाचा हा मान मिळणार आहे. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यातील पालकमंत्री पदासाठी मागील काही काळापासून सुरु असलेला संघर्ष पाहता रायगडसाठी हा तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मंत्री आदिती तटकरे या पालघर जिह्यात झेंडा वंदन करणार असून रायगडचे पालकमंत्री असणारे उदय सामंत रत्नागिरीमध्ये उपस्थित असणार आहेत.

ध्वजारोहणाच्या या तोडग्याने पालकमंत्री पदाचे वाद तात्पुरते का होईना टाळले गेले असले तरी लवकरच यावर निर्णय राज्यसरकारला घ्यावा लागणार आहे.

कोणते मंत्री कुठे करणार झेंडावंदन ?

देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर