कोणत्याही वास्तूला महाराजांचे नाव देताना आदरानेच देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा स्वाभिमान – खासदार श्रीकांत शिंदे

 

दिल्ली : शिवसेनेचे लोकसभेतील खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिल्ली येथील ‘शिवाजी ब्रीज’ आणि ‘शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन’ चे नामांतर करून ‘छत्रपती शिवाजी महाराज ब्रीज रेल्वे स्टेशन’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन’ करण्यात यावे,अशी मागणी केली आहे.

याबाबत सोशल मीडिया पोस्ट द्वारे त्यांनी माहिती दिली आहे. अधिवेशन नियम ३७७ अंतर्गत ही मागणी केली केल्याचे त्यांनी सांगितले आहे.” छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणत्याही वास्तूला महाराजांचे नाव देताना आदरानेच देण्यात यावे. या भावनेतून संसदेत ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून केली होती. आजही महाराजांचे विचार आणि हिंदुत्वाच्या वाटेवर शिवसेनेचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आणि महाराजांप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने अधिवेशनाच्या माध्यमातून हा महत्वाचा विषय मांडला असे म्हणत यावर केंद्र सरकारच्या वतीने लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.