आपल्या समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे आपले आद्य कर्तव्य समजावे, असे केल्यास आपल्या भारताचे स्वातंत्र्य नक्कीच चिरायू होईल – चंद्रकांत पाटील

अलिबाग : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या रायगड जिल्ह्यातील समारंभात सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी पाटील यांनी शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन सर्व उपस्थितांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी आणि विद्यार्थ्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे, निवासी जिल्हाधिकारी श्री शिर्के यांच्या सह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सोशल मिडियाच्या माध्यमातून हि चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन! आपल्या पूर्वजांनी त्याग आणि अपार कष्टातून हे स्वातंत्र्य मिळविले आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी तुरूंगवास सोसला तर अनेकांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्याबरोबर आलेली कर्तव्येही आपण निभावली पाहिजेत. विशेषतः देशाच्या संविधानाने नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये बहाल केली आहेत. त्याचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. आपल्या समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे आपले आद्य कर्तव्य समजावे, असे केल्यास आपल्या भारताचे स्वातंत्र्य नक्कीच चिरायू होईल असे मी मानतो.
स्वातंत्र्य लढ्यातील सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना, क्रांतिकारकांना व स्वातंत्र्यसैनिकांना माझे कोटी कोटी नमन! सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! असे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे.