ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान

पुणे :  पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला.

अशोकमामांविषयी प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे असे नमूद करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांची नाटके हमखास यशस्वी ठरायची. त्यांचे अनेक चित्रपट, नाटके यशस्वी ठरले. आज कर्तृत्व आणि नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही, असे सुंदर मिश्रण अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात जाणवते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसे चांगले काम करीत असल्याची खात्री पटते, असे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षण विभागाने संशोधनावर भर दिला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधनासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देऊन लेखक प्रसाद तारे यांचे त्यांनी अभिनंदन केले. कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या आगामी ‘श्रीमंत योगी’ नाटकाला सहकार्य करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज-व्यक्तिमत्वाचे भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. ब. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.