मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा – चंद्रकांत पाटील

मुंबई : काल मंत्रालया येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणी संदर्भात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकी दरम्यान, मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळावा यासाठी तसेच शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी नवीन अभ्यासकेंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असलेल्या मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन या बैठकीत पाटील यांच्या कडून करण्यात आले.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे तसेच उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.