तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रमात वाढ करावी; चंद्रकांत पाटलांचे आवाहन

पुणे: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करियर कट्टा’ अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर झालेल्या महाविद्यालयांना प्रमाणपत्र व निधी वितरण सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.

 पाटील म्हणाले,रोजगार, नोकरी देणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक शिक्षण घेण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे रोजगार मिळण्यावर परिणाम होत असल्याने करियर कट्ट्याची कल्पना समोर आल्यावर त्याला प्रोत्साहन दिले. जगभरामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठात चाललेल्या घडामोडी, नवनवीन आव्हाने याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
विद्यापीठांनी पारंपरिक शिक्षणातून बाहेर पडत आवश्यकतेप्रमाणे, मागणीप्रमाणे अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज होती. त्याप्रमाणे नवनवीन अभ्यासक्रम सुरू झाले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये रोजगार, नोकरी देणारे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. चांगल्या कल्पना समाजासमोर ठेवल्यास त्या सत्यात येण्यासाठी सामाजिक संस्थांकडून आर्थिक सहाय्याचा हातदेखील निश्चितच मिळतो. आपल्याला तरुणांना दिशा द्यायची आहे, हे लक्षात घेऊन महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांची वाढ करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.