कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्यालय हे आपले घर आहे असे मानून काम करावे – चंद्रकांत पाटील

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा उत्तर या कार्यालयाचे उद्घाटन काल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. संतोष नगर भाम येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले असून,अद्यावत स्वरूपाच्या या कार्यालयात बैठकासाठी हॉल,अध्यक्ष आणि सरचिटणीस केबिन, वॉर रूम, सुरू करण्यात आली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यालयाची बारकाईने माहिती घेऊन कार्यालयातील स्वयंसेवक यांच्याशी देखील चर्चा केली. उद्घाटन सोहळ्यास उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्यालय हे आपले घर आहे असे मानून काम करावे. विरोधकांची आघाडी म्हणजे विना लोकोपायलट असलेली ट्रेन आहे. कोविडमध्ये मा. मोदीजींच्या कार्यकर्तृत्वाची संपूर्ण जगाने दखल घेतली. त्यांच्या नेतृत्वात ६० देशांना कोविडची लस मोफत देण्यात आली. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी प्रत्येकाच्या खात्यात सहा हजार रुपये दिले जात आहेत. प्रत्येक नागरिकाचे जनधन योजनेच्या माध्यमातून बॅंकेमध्ये खाते सुरू करुन दिले आहे. त्यामुळे भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या नेतृत्वात राज्य आणि केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन्मयतेने काम करावे, असे आवाहन यानिमित्ताने केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, विधानसभा निवडणूक प्रमुख रवी भेगडे, आशाताई बुचके, अतुल देशमुख, प्रदीप कंद, जयश्री पलांडे यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.