पुणेकर कोकणवासीयांना आता गणेशोत्सवासाठी गावी जाताना टोल माफी…. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव हा जल्लोषात पार पडणार आहे. चाकरमान्यांची कोकणात जाण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोफत बस सेवा देण्यात आली आहे. पुण्यातील कोकणवासीयांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास मागणी केली होती. ती म्हणजे टोल माफीची. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने पुणेकर कोकणवासीयांना आता गणेशोत्सवासाठी गावी जाताना टोल भरावा लागणार नाही.

मुंबई प्रमाणे पुण्यातूनही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुण्यातील कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात टोल माफी मिळावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे मागणी करत त्यामध्ये असे नमूद केले होते कि, पुणे जिह्यात मोठ्या प्रमाणात कोकणवासी राहतात. यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हे कोकणवासी त्यांच्या मूळ गावी जातात. तरी पुणे जिल्ह्यात राहत असलेल्या या सर्व कोकणवासीयांना आपल्या गावी जाताना टोल माफी देण्यात यावी अशी विनंती पाटील यांनी केली होती.
चंद्रकांत पाटील यांच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे. त्यांची हि विनंती राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. कोकणवासीयांसाठी घेतलेल्या निर्णयाप्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांचे चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले आहेत.