पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक अशा महापुरुषांच्या पद्स्पर्शाने ही भूमी पावन झाली. अशा या ऐतिहासिक पुण्यात शनिवार वाडा, लाल महाल, विश्रामबागवाडा, सारसबाग, केसरीवाडा, लकडीपूल, भिडे पूल अशा अनेक वास्तू आणि रचना आहेत. त्यापैकी पीएमसी बिल्डिंगपासून सुरू होणारी आणि शनिवार वाड्याच्या समोर संपणारा हेरिटेज पूल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पूल! आज या पुलाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.

रावबहादूर गणपतराव महादेव केंजळे यांनी ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या पूलासोबत अनेक पुणेकरांच्या आठवणी जुळलेल्या आहेत. आज या पुलाच्या शतकपूर्ती निमित्त केंजळे परिवाराने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच या पुलाचे नामकरण महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे करण्याचे नियोजन केले असून त्या फलकाचे अनावरण देखील पाटील यांनी केले.