विकसित भारतासाठी भाजपा ला साथ द्या वर्धा येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

18

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प सोडला आहे. या विकासाच्या संकल्पाला साथ देण्यासाठी रामदास तडस यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे बुधवारी केले. वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार, खा.रामदास तडस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विजय संकल्प सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा.डॉ.अनिल बोंडे, ज्येष्ठ नेते रामदास आंबटकर, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षाचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यावेळी म्हणाले की, वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त झाला, मात्र या भागातून पंजाही गायब होण्याचे श्रेय शरद पवारांना आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही सापडला नाही, परिणामी राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली.

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या खा. तडस यांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तडस हे पुन्हा विरोधकांना धोबीपछाड देणार आहेत. शरद पवार यांचे कुस्तीतील पॅनल ताब्यात घेणारे तडस यांना यंदा 60 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महात्मा गांधीजी यांची भूमी असलेल्या वर्धा मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे रामदास तडस हे संयमी खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या दोन कालावधी दरम्यान लोकसभेत 1035 प्रश्न उपस्थित केले. तर 113 चर्चांमध्ये सहभाग घेतला. अशा कार्यक्षम उमेदवारालाच वर्ध्याचे मतदार पुन्हा निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खा. तडस यांचे ही यावेळी भाषण झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.