निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा अर्थसंकल्प असून उच्चशिक्षणाला नवीन दिशा देईल, असा ठाम विश्वास – चंद्रकांत पाटील

45
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक क्षेत्रातील तरतूद जाहीर केली असून रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सादर केल्या आहेत. अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा केली आहे. महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण,  याच्यासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. देशातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा घेण्यात आलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय आणि उल्लेखनीय असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि, कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने हे 10 लाखांचे कर्ज जाहीर केले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता येण्यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाऊचरही दिले जाणार आहेत. कर्जाच्या रकमेच्या ३ टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी हे ई-वाउचर दिले जातील. यासोबतच मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाईल. तसेच, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारणे अतिशय कौतुकास्पद आहे. एकूणच, आज सादर झालेला अर्थसंकल्प शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा अर्थसंकल्प असून उच्चशिक्षणाला नवीन दिशा देईल, असा ठाम विश्वास वाटत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.