पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचा झेंडा! कौस्तुभ गावडे यांचा दणदणीत विजय; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

59

पुणे, २८ ऑक्टोबर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या ऐतिहासिक विजयाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौस्तुभ गावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या या यशामुळे शिक्षण क्षेत्रात आणि समाजकार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

या मोठ्या विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्वोच्च नेतृत्वाला देत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिक्षक मतदारसंघातील या विजयासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अथक मेहनत घेतली आणि अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांचेही हा विजय साकारल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!”

महायुतीवर आणि कौस्तुभ गावडे यांच्या तरुण नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मतदान करणाऱ्या सर्व सन्माननीय शिक्षक मतदारांचे मंत्री पाटील यांनी जाहीर आभार मानले आहेत. तसेच, निवडणुकीच्या प्रचारात अहोरात्र कष्ट करून हा विजय खेचून आणणाऱ्या महायुतीच्या सर्व नेते, पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचेही त्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.