नवीन आणि बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे -राज्यपाल चे. विद्यासागर राव
महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क येथे साजरा
मुंबई : महाराष्ट्र हे देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून ते देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगताना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनी नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,असे आवाहन केले.
महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यु. पी. एस. मदान, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्यासह राज्य शासन आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे कौन्सुलेट जनरल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Courtesy : DGIPR