“च्यायला भरत जाधव ने आज रडवला यार..!” चाहत्याकडून मिळालेलं कौतुक शेअर करत भरत जाधव म्हणतात…

मुंबई: अभिनेते भरत जाधव यांचे नाव उच्चारले की, ‘गोड गोजिरी, लाज लाजिरी…’ हे गाण किंवा ‘गलगले निघाले’, ‘जत्रा’, ‘पछाडलेला’ असे चित्रपट लगेच डोळ्यासमोर उभे राहतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर भरत जाधव विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट या विशेष असतात.

आपल्या लाडक्या अभिनेत्याने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते. नुकतेच त्यांना एका चाहत्याने दिलेली प्रतिक्रिया त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. ‘खरंतर कलाकाराने स्वतःच कोडकौतुक करायचं नसत. पण एका रसिकाने मनापासून दिलेली सुखद दाद तुम्हा सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली’, असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.

‘मागच्या आठवड्यात काम करून रात्री घरी आलो त्यादिवशी बराच उशीर झाला होता. भूकही लागली होती आणि फार दमलो होतो.आई आणि वडील बेडरूममध्ये झोपी गेले होते. फ़्रेश झालो आमटी गरम केली, जेवण वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली.मुड फ्रेश व्हावा म्हणून टीव्ही चालू केला. 805 दाबलं हास्य जत्रा नव्हतं लागलं म्हणून 804 वर गेलो. ‘क्षणभर विश्रांती’ लागला होता.बरं वाटलं. खरंच विश्रांती मिळाली. आणि नेमका त्याचवेळी भरत जाधवचा त्या चौघांना बंगल्याबद्दल खरं सांगण्याचा टेरेसवरचा सिन सुरू झाला होता. या आधीही मी हा सिन खुप वेळा बघितला होता पण त्यादिवशी काहीतरी वेगळंच घडलं. ते बघत असताना अंगावर काटे आले आणि भरत जाधवच्या त्या तीन चार मिनिटांच्या सिनने अक्षरशः रडवलं मला.! सिन जेंव्हा संपला तेंव्हा मी निःशब्द झालो होतो.आणि तेंव्हा काय वाटलं होतं ते शब्दांत तरी नाही सांगता येणार.पण बऱ्याच काळापासून न रडलेल्या माझ्या तोंडी एक वाक्य आपोआप आलं “च्यायला भरत जाधव ने आज रडवला यार..!”

आता दिवस होता परवाचा. सेम रुटीन, सेम सर्व. जेवण गरम केलं जेवायला बसलो, हास्य जत्रा लागलं नव्हतं म्हणून पुढे गेलो आणि चित्रपट लागला होता ‘शिक्षणाच्या आयचा घो.’ श्री ला नुकतंच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि त्यानंतर जे मी अनुभवलं ते खरंच शब्दांत सांगण्याच्या पलीकडचं होत.आज पुन्हा एकदा भरत जाधव ने मला रडवल होत.

आज पर्यंत अनेक मराठी हिंदी इंग्रजी आणि ईतर भाषांचे चित्रपट पाहिले. मग मी आठवायचा प्रयत्न केला की कोणत्या अभिनेत्याचा अभिनय बघून मला असा वेगळाच अनुभव आला आणि रडायला आलं..? उत्तर मिळालं, एकही नाही!

त्याक्षणी बाकी जगाचं माहीत नाही पण माझ्यासाठी भरत जाधव हा जगातला सर्वात उत्कृष्ट अभिनेता होता. आता जो पर्यंत एखादा अभिनेता असं काही किंवा या पेक्षा कमाल अनुभव देत नाही तो पर्यंत माझ्यासाठी भरत जाधवच सर्वांत उत्कृष्ट अभिनेता असेल.’, अशी प्रतिक्रिया प्रशांत बर्गे नावाच्या एका चाहत्याने भारत जाधव यांना दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!