राज्य सरकारचा मोठा निर्णय: आता महिला पोलिसांची ड्युटी १२ तासावरुन ८ तासांची

मुंबई: महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांबाबत महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांची ड्युटी ही १२ तासांहून कमी करून ती ८ तास करण्यात येणार आहे. याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिली. या निर्णयाचे कौतुक महिला पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, महिला पोलिसांच्या ड्युटीमध्ये ४ तासांची कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची करण्याबाबत नागपूर शहरात प्रायोगिक तत्वावर ८ तासांच्या ड्युटीचा उपक्रम सुरु केला होता. त्यानतंर पोलिस महासंचालक यांनी या निर्णय़ाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती. पुढे पुणे ग्रामीण पोलिसातील महिलांसाठीही ८ तासांची ड्युटी करण्यात आली होती.

सुप्रिया सुळे यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री मा. दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!