तीन प्रभाग पद्धतीविरोधात काँग्रेसचा ठराव : नाना पटोले म्हणतात…..

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला आता काँग्रेसनं विरोध केला असून, तसा ठरावही मंजूर केला आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावामागील भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा त्याला विरोध आहे. याबद्दल नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं.

नाना पटोले म्हणाले, ‘जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांची मतं विचारात घेणं हे संघटनेचं काम आहे. सरकारची कुठली भूमिका असेल आणि जनतेचा त्याला विरोध असेल, तर पक्ष संघटना म्हणून जी भूमिका मांडणे योग्य आहे ती आम्ही मांडू आणि कालच्या आमच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये भूमिका मांडलेली आहे’, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

‘तीन पक्षांचं सरकार आहे. भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही आमचे नेते बाळासाहेब थोरात त्यांनासुद्धा कळलेली होती, परंतु जो निर्णय झालेला आहे; त्यावर पुढच्या कॅबिनेटमध्ये पुनर्विचार व्हावा, अशी मागणीसुद्धा आम्ही केलेली आहे’, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.