किरीट सोमय्या यांना विरोध करू नका; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

10

कोल्हापूर: मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या  यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. या प्रकरणावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा भाष्य केले . ते कागलमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

माझ्यावर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. ऐकीव माहीतीच्या आधारे ते हे सर्व आरोप करीत आहेत . आम्ही याबद्दल योग्य ती कागदोपत्री कारवाई करणारच आहोत. पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने संयम ठेवावा. जो पर्यंत तुम्ही लोक आणि परमेश्वर माझ्या पाठीशी आहात तो पर्यंत मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे सोमय्या यांना कागल तालुक्यात येऊ द्या. विरोध करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे , असे आवाहन हसन मुश्रीफांनी केले आहे.

तसंच सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचं राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीही त्यांनी पाहावी, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही

शाहू कारखाना आणि हमीदवाडा कारखान्यात आपलं योगदान असताना काही कारणामुळे आपल्याला बाजूला व्हावं लागलं. मात्र शेतकरी, कामगार, मजूरांना आपल्या हक्काचा कारखाना असावा अशी भावना होती. तेव्हाच आम्हाला सहकारी कारखाना काढावा लागला. त्यांचा आरोप आहे की या कारखान्यासाठी मुश्रिफांनी सत्तेतून पैसा मिळवला असावा. पण एका केंद्रीय संस्थेकडून तपास झाला आहे. गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही. उत्कृष्ट पद्धतीनं हा कराखानाचा चालला आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केलाय.

Get real time updates directly on you device, subscribe now.