नाशिकमध्ये महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण

नाशिक: महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच चक्क मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  महिलांची छेडछाड केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. विशेष म्हणजे ही तक्रार पोलिस हवालदार सागर जगन्नाथ जाधव यांनी दिली होती. तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलिस संत कबीरनगर झोपडपट्टीत भागात गेले. याप्रकरणी पोलिसांनी अजय घुले या संशयिताला पूर्वीच अटक केली आहे. त्याच्या सांगण्यावरून संशयित महेश कटारिया याच्यावरही सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतच्या तपासाची विचारपूस पोलिसांनी कटारिया याच्याकडे केली. तेव्हा त्याने जोरजोरात आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. त्याची आई, बहीण आणि मित्रांना चक्क रॉकेलची कॅन घेऊन बोलावले. तेव्हा एक महिला यावेळी डिझेलची कॅन घेऊन आली. परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे पोलिसांनी पुढे होत डिझेलची कॅन हातात घ्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीने अंगावर डिझेल ओतून घेतले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाच मारहाण सुरू केली. फिर्यादी असणारे पोलीस हवालदार सागर गुंजाळ व पथकातील कर्मचाऱ्यांना त्याने चापटाने मारहाण केली. गलिच्छ शिवीगाळ केली. शिवाय त्यांना धमकीही दिली. त्यामुळे पोलिसांनी गंगापूर पोलिस ठाण्यात महेश कटारियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.