आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढवलेली असताना, कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल? – चंद्रकांत पाटील

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने बलात्काराच्या घटना वाढत असून महिला सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच साकीनाका आणि डोंबिवली सामुहिक बलात्काराची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्र घेतला. मात्र, हे प्रकरण ताजा असताना कल्याण तसेच महाबळेश्वरमधेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणाचा तपास आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

“कल्याणमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वर मध्येदेखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे. आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही.” असा टोमणा चंद्रकांत पाटलांनी मारला.

याचबरोबर, आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का? असा प्रश्नही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!