‘सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचंच’; अजित पवार म्हणतात….

पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. त्यावेळी सोमय्यांना त्यांच्या निवासस्थानी तब्बल 6 तास स्थानबद्ध करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही त्यांना एक नोटीस दाखवून कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी कबुली दिली आहे. किरीट सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं, असं अजित पवार यांनी म्हटलं. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या यांच्याबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं. कुणाला काही पाहणी करायची असेल तर ती करु द्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. त्याबाबत विचारलं असता, कुणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करु. त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या. मला त्यावर काही म्हणायचं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. असे 100 अजित पवार खिशात घालून फिरतात असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, मला त्यावर काही बोलायचं नाही. मी फक्त विकासावर बोलेन. तुम्ही माध्यमं तरी कशाला अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देता. अशा वक्तव्याला प्रसिद्धी देऊ नका, असं आवाहन अजित पवारांनी केलंय.