UPSC साठी सोडली नोकरी; यवतमाळच्या ‘या’ तरुणाने कसं मिळवलं यश?

7

यवतमाळ: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. यावेळी आर्णी येथील दर्शन दुगड या विद्यार्थ्याने मेहनतीच्या जोरावर 138 वा क्रमांक मिळवला आहे. दर्शनचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत तर आई संतोषी गृहिणी आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून तो पुढे आला. लहानपणा पासून मोठा अधिकारी होण्याचं तो स्वप्न पाहत होता. त्या दृष्टीने त्याने प्रयत्न करून आज हे यशाचं शिखर गाठलं आहे.

अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला हैदराबाद आणि मुंबईच्या एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी केली. मात्र या नोकरीबाबत तो समाधानी नव्हता. त्यामुळे लहानपणी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यासाठी त्याने 2018 साली खाजगी कंपनीची नोकरी सोडली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली.

पहिल्या प्रयत्नात त्याला यश संपादन करता आले नाही मात्र जानेवारी 2021 मध्ये झालेल्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश प्राप्त झाले. प्राथमिक शिक्षण त्याने अर्णीच्या मराठी शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर तो शिक्षणात कधीच मागे राहिला नाही. नोकरी लागल्यानंतर त्याने ती नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेचा जो निर्णय घेतला त्याला देखील त्याच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. दर्शनने आता नोकरीच्या माध्यमातून देशाची सेवा करावी. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा. अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे. तर मोठ्या भावाला मिळालेल्या यशाने बहीणही भारावून गेली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.