महेंद्रसिंग धोनी म्हणतोय, माझ्या भावाने ‘या’ खेळाडूच्या विरोधात लिहली स्क्रिप्ट
दुबई: आयपीएलच्या मैदानात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. धोनीच्या चेन्नईने आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे धोनी आता शारजाचा बादशाह झाला आहे. चेन्नईने RCB चा 6 विकेट्स राखून सहज पराभव केला. RCB चे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनीही अर्धशतकं ठोकून भक्कम सुरुवात करुन दिली होती. मात्र RCB ला केवळ 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. मग 158 धावांचं आव्हान घेऊन मैदानात आलेल्या धोनी ब्रिगेडने चार विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.
धोनी शारजाचा बादशाह कसा झाला, चेन्नईच्या विजयाची स्क्रिप्ट कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर धोनीने स्वत: दिलं, तो म्हणजे धोनीचा भाऊ. धोनीचा भाऊ RCB विरुद्धच्या विजयात नायक बनला. त्यामुळेच या सामन्यानंतर धोनीने आपल्या या भावाचं तोंडभरुन कौतुक केलं. आता धोनीने संघातील खेळाडूला भाऊ म्हटलं आहे तर भावासोबत वाद-विवाद तर आलेच. मात्र धोनीने या वादाचं कारणही सांगितलं.
धोनी ज्याला आपला भाऊ म्हणत आहे, तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून, तो आहे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू डी जे ब्राव्हो. ब्राव्हो हा गेल्या अनेक वर्षांपासून धोनीच्या चेन्नईकडून आयपीएलच्या मैदानात उतरतो. सामन्यानंतर धोनीने ब्राव्होचं कौतुक केलं.
धोनी म्हणाला, ब्राव्हो फिट आहे ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. तो आपल्या डावपेच योग्यरित्या अमलात आणत आहे. मी त्याला माझा भाऊ म्हणतो. आमच्यात नेहमीच ‘स्लोअर बॉल’वरुन वाद होतो. तू स्लो बॉल टाकतो हे सगळ्यांना कळलंय असं मी ब्राव्होला नेहमी सांगतो. त्यामुळेच मी त्याला एका ओव्हरमध्ये 6 बॉल हे वेगवेगळेच असले पाहिजेत हे सुद्धा मी त्याला सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्याने उत्तम कामगिरी केली, असं धोनीने सांगितलं.