नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार – अजित पवार

पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रजमध्ये 2 हजार 215 कोटी रुपयांच्या 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गाच्या कामाचं भूमीपूजन होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवारसाहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशी नितीन गडकरी यांची इच्छा असल्याचं अजित पवार म्हणाले.

पुण्यात शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. या दरम्यान, बारामती आणि सासवडमध्येही नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवार यांनी उपस्थित राहावं असा नितीन गडकरी यांचा आग्रह आहे. त्यानुसार लवकरच या कार्यक्रमांचं नियोजन करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

पोलिस खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी वरिष्ठांनी घेतली पाहिजे. पुण्यात काही अधिकारी तणावात राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. त्यामुळे असे प्रकार घडले नाही पाहिजेत. एकीनं काम करून विषय मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आणि आपुलकीचा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलाय.