मुंबईत ‘या’ अटीवर आठवी ते दहावी व त्या पुढच्या, वर्ग भरवण्यास परवानगी

मुंबई: राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आठवी ते दहावी व त्या पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळा, वर्ग भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण सरसकट या शाळा सुरु होणार नाहीत. कोविड नियमांचे पालन करुनच सर्व शाळा सुरु होतील.

तसेच सॅनिटायझेशनपासून ते मास्क आणि पालकांचे समतीपत्र या सर्व गोष्टींची शाळा सुरु करताना खबरदारी घेण्यात येईल. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अंतिम परवानगीनंतरच या शाळा सुरु होतील, असे महापालिकेतील शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

मुंबई महापालिका शाळा बाबत सोमवारी निर्णय होईल. पालिकेचा शिक्षण विभाग एक प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवेल. आयुक्तांनी मंजुरी दिली की हा निर्णय जाहीर केला जाईल. कोरोनाचे सर्व नियम पाळण्याची पालिकेने तयारी केली आहे. ज्या वर्गाच्या शाळा सुरू करणार त्या वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल. एक दिवसा आड विद्यार्थ्यांना बोलवण्याचा विचार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना घेण्याआधी पालकांचं हमी पत्र घेतलं जाईल.

70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुंबईत अल्टरनेट डे स्कुल सिस्टिम राबवण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. एक विद्यार्थी एकाच बेंचवर बसणार असल्या कारणानं एक विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत यावा, अशी व्यवस्था उभारली जाईल. त्यामुळे, शिक्षकांना सलग दोन दिवस एकच अभ्यासक्रम शिकवावा लागणार आहे.