सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी संभ्रमात; अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अमरावती: आज होणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील 6205 पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला. मात्र सरकारच्या या गोंधळाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागलं. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सरकार प्रति विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष दिसून आला,जवळजपास तास भर हे आंदोलन चालले

आज या सरकारने परीक्षा रद्द करून गोंधळ घातला आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम इथल्या आरोग्य विभागाने केलं आहे. रातोरात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयामुळे सगळे विद्यार्थी गोंधळात आणि संभ्रमात आहेत. मागच्या वेळी जी कंपनी ब्लॅकलिस्टेड होती त्या कंपनीला पुन्हा परीक्षा घेण्याचं कंत्राट सरकारने का दिलं आणि ते लक्षात आल्यानंतर परीक्षा एकाएकी रद्द का केल्या असाही प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

विद्यार्थिनी निकीता शेंडे म्हणाली, आरोग्य विभागाने ज्या परीक्षा रद्द केल्या त्या ऐकून आम्ही संभ्रमात आहोत. आम्हाला सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे मनस्ताप होतो आहे. परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरण्यापासून ते हॉल तिकिट काढेपर्यंत प्रॉब्लेमच येत आहेत. मागच्या दोन वर्षांपासून परीक्षा झालेली नाही. आता यावेळी होणार होती ती रद्द केली. घरातले लोक आम्हाला किती दिवस अभ्यास करू देणार? असाही प्रश्न निकीताने उपस्थित केला आहे.

आम्ही या परीक्षेसाठी मेहनत करून तयारी केली होती. ट्रेनचं रिझर्व्हेशन करून ठेवलं होतं. अचानक रात्री दहा वाजता सरकारने निर्णय घेतला की परीक्षा रद्द आता आम्ही काय करायचं? न्यासा कंपनीनेही याबाबत विचार केला पाहिजे. जी मुलं बाहेरगावी आहेत त्यांचा राहण्याचा खर्चही वाढतो आहे. मागच्या वेळी जसा गोंधळ झाला तसा व्हायला नको. पारदर्शीपणाने परीक्षा घ्या. सरकार जर असंच वागणार असेल तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं काही खरं नाही असंही निकीताने म्हटलं आहे.