भाजप-मनसे युतीच्या चर्चेला पूर्णविराम, राज्यातील पहिली युती ‘या’ जिल्ह्यात जाहीर!

5

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी किती काळ विरोधात बसायचे? आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने भारतीय जनता पक्षाशी युती करावी, अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. असं असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दोन महिन्यापूर्वी नाशिकमध्ये भेट झाली होती. त्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील घरी जाऊनही भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीबाबतच्या चर्चांना बळ आलं. चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी मान्य केलं मात्र, आगामी निवडणुकीबाबत युतीसाठी कसलाही प्रस्ताव दिला नसल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं होतं.

असं असलं तरी दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळे कार्यकर्त्यांच्या युतीबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यभरात भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना, पालघरमध्ये पोटनिवडणुकीसाठी युती झाली आहे.

पालघर पोटनिवडणूक

पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील 15 सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समिती मधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.