भाजपचा मोठा निर्णय; शब्द आणि परंपरा पाळणार, राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार

4

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होत असलेल्या पोटनिवणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे आज आपला अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 23 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली. भाजपनेही काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. दुपारी 1 वाजात ते उमेदवारी माघारी घेण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर होती. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आज अखेर चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.