इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने 34 व्या वर्षी कसोटी क्रिकेटला ठोकला रामराम

मुंबई:  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा लवकरच एक मोठा निर्णय जाहीर करणार आहे. सध्या सुरू असलेले IPL आणि त्यानंतर होणारा T20 World Cup यामुळे सध्या क्रिकेट चाहते खुश आहेत. या दोन मोठ्या मालिका संपल्यावर पुन्हा उभय देशांमधील मालिकांना सुरूवात होईल. या दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची शक्यता आहे. Ashes मालिका सुरू होण्याआधी तो हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

६४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारा मोईन अली कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचे सांगितले जात आहे. घर आणि कुटुंबापासून दूर राहण्याचा कालावधी दिवसेंदिवस वाढत असल्याचे कारण देत तो कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणणार आहे, अशी माहिती इएसपीएनक्रिकइन्फोने दिली आहे. T20 World Cup आणि Ashes मालिका एकाच महिन्यात असून त्या दोन्ही संघात त्याचा समावेश असणार आहे. मात्र, इतक्या वेळ कुटुंबापासून दूर राहणं शक्य नसल्याने तो Ashes मालिकेआधीच कसोटी क्रिकेटला बाय-बाय करणार असल्याचे बोलले जात आहे.

सध्या मोईन अली युएईमध्ये CSK संघाकडून खेळतो आहे. त्याला अद्याप दुसऱ्या टप्प्यात चेन्नईकडून खेळताना फारशी छाप पाडता आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मोईन अलीने आपल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड आणि कसोटी संघाचा कर्णधार जो रूट यांना या निर्णयाची कल्पना दिली आहे. मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी त्याला वन डे आणि टी२० क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे तो कसोटीतून निवृत्त झाल्यानंतरही आपल्या देशासाठी निर्धारित षटकांचे सामने आणि विविध टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळतच राहणार आहे.