आरोग्य विभागाची परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये होणार – राजेश टोपे

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात आली होती.  ही परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये होणार असून, परीक्षेच्या तारखेबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांची सरळ सेवा प्रक्रियेतून भरती केली जाणार आहेत. यासाठी २५ व सप्टेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, ऐनवेळ परिक्षा स्थगित करण्यात आली होती. न्यासा संस्थेमुळे परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचं सांगत लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.

आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील जागांसाठी ही भरती परीक्षा रद्द करावी लागली होती. यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल मी माफी मागतो व या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे राजेश टोपे यांनी नमूद केले होते. टोपे यांनी या सर्वाचे खापर परीक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या न्यासा कम्युनिकेशनवर फोडले. न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा पुढे ढकलावी लागत आहे. दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती दिली. परीक्षा १५-१६ किंवा २२-२३ ऑक्टोबर घेतली जाईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.