पडक्या घरात जादूटोण्याचा खेळ, गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी, जालना पोलिसांनी उधळला डाव
जालना: जालना जिल्ह्यात जादूटोण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने एका नराधमाने मांत्रिक महिलेच्या मदतीने आपल्या पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांनी महिलेची बाजू ऐकून घेतली. तिच्या तक्रारीची नोंद घेत ती सांगत असलेल्या घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर महिला सांगत असलेल्या गोष्टी खऱ्या असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीसह तिचा मित्र आणि एका महिला मांत्रिकाला बेड्या ठोकल्या.
संबंधित घटना ही जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या डोणगाव येथील आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा पती संतोष पिंगळे, त्याचा साथीदार जीवन पिंगळे यांच्यासह एका महिला मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर या प्रकराची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर तालुक्यातही या विषयावर चर्चा होऊ लागली आहे.
पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जावून सर्व प्रकरणाची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. पोलीस गावातील पडक्या घरातही गेले. तिथे तपास केला असता घरात पुजेचे काही साहित्य सापडले. ते पाहून पीडिता खरं सांगत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी नंतर पीडितेच्या पतीसह आणखी दोघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी आरोपींविरोधात नरबळी, अनिष्ट आणि अघोरी अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.