ईडीच्या कारवाईदरम्यान शिवसेना नेते आनंदराव अडसुळांची प्रकृती बिघडली

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाने  छापेमारी केली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. आज (27 सप्टेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवलीमधील घरी छापा मारला. तसेच त्यांच्या कार्यालयावर देखील छापा मारण्यात आला. यानंतर साधारण तीन तास अडसूळ यांची चौकशी करण्यात आली.

दरम्यान, ही चौकशी सुरु असतानाच अडसूळ यांची अचानक तब्येत खराब झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका बोलविण्यात आली. यावेळी त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आलं आणि गोरेगावमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे. अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.