राज्यात पुढील ४८ तास ‘या’ भागात अतिवृष्टीची शक्यता; IMD कडून अलर्ट

मुंबई: गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे. मुसळदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून बचावकार्य सुरू झालं आहे.

येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे. पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.