कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळणार – हसन मुश्रीफ
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हातील शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याची मोठी घोषणा केली आहे. बँकेच्या 83 व्या वार्षीक सभेत बँकेच अध्यक्ष राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे.
बँकेची वार्षिक आढावा बैठक सोमवारी झाली. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि 175 कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. शून्य़ टक्क्याने कर्ज देणारी केडीसीसी ही पहिलीच बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याची मागणी केली होती. यामुळे तीन लाखांची कर्ज मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली आहे.
संचालक मंडळाने प्रशासकाकडून सहा वर्षांपूर्वी बँकेची सूत्रे ताब्यात घेतली. तेव्हा बँक तोट्यात होती. गेल्या सहा वर्षांत 103 कोटी रुपयांचा तोटा भरून काढत बँकेने 145 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. सध्या बँकेत ७१४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी 9000 कोटी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. बँकेने 18.22 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
शेतकरी, दूध उत्पादक, इंडस्ट्रीज, साखर कारखानदार, सूत गिरण्या अशा विविध घटकांसाठी कर्ज मंजुरीचे धोरण अवलंबलेले आहे. बँकेने व्यवसाय वाढीसाठी व्यक्तिगत कर्जाच्या विविध योजना आणल्या आहेत. म्हैशीच्या दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी दूध उत्पादकांना अर्थ पुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही मुश्रीफ म्हणाले.