कीर्तनकार ह.भ.प ताजोद्दीन महाराज शेख यांना कीर्तन सुरु असताना हृदय विकाराचा झटका आल्याने दुःखद निधन

धुळे: महाराष्ट्रातले प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचं सोमवारी रात्री निधन झालं. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जामदे गावात किर्तन सेवा सुरु असताना ताजोद्दीन महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यावेळीच त्यांनी आपला देह ठेवला.  ज्ञानेश्वरीच्या पारायण सप्ताहानिमीत्त या किर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं.

किर्तनादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ताजोद्दीन महाराज अचानक खाली कोसळले. यावेळी स्थानिक मंडळींनी उपचारासाठी त्यांना नंदूरबार येथे नेत असताना वाटेतच त्यांचं निधन झालं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताजोद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायीक आणि किर्तन सेवेची सुरुवात औरंगाबाद शहरातून केली. किर्तन, भारुडं, गवळणी, रामायण कथा याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संत साहित्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, वीर सावरकर यांच्यावरही ते आपल्या किर्तनातून भाष्य करायचे. आपल्या प्रत्येक किर्तनातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे हा त्यांचा प्रयत्न असायचा.

दोन वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातच एका किर्तनादरम्यान ताजोद्दीन महाराजांनी किर्तन करताना मला मरण आलं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन असं वक्तव्य केलं होतं, आणि दोन वर्षांनी हा योगायोग महाराजांच्या आयुष्यात घडून आला. मुस्लीम धर्मात जन्म झाला असला तरीही महाराजांनी कधीही कट्टरतावादी विचारांना न जुमानता आपली किर्तनसेवा सुरु ठेवली. ताजुद्दीन महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त केला जात आहे.