मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळाचे थैमान, आता पर्यंत ३५ बळी; ४ हजार जनावरे वाहून गेली

औरंगाबाद: मराठवाड्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर परिसरात पावसाने आतापर्यंत ३५ जणांचे बळी गेले आहेत. या भागातील नदींना आलेल्या पुरात ४ हजार जनावर वाहून गेली असावीत असा अंदाज आहे. २० लाख हेक्टरवरच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण मराठवाड्याला फटका बसला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन असून नुकसानाचं प्रमाण कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं जयंत पाटील म्हणाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळं औरंगाबाद  शहरालाही फटका बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले.

उस्मानाबादमध्ये मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधल्या केज, अंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात खूप पाऊस झाला. पिकांचं मोठं नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातही पावसाने दाणादाण उडवली आहे. अर्धापूर तालुक्यात २४ तासांत १२९ मि. मी. पाऊस पडला. औरंगाबादच्या सोयगाव, सिल्लोड, फुलंब्रीमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंगोलीच्या वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यालाही पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तसेच जालन्याच्या भोकरदनमधील केळणा नदीला पूर आल्याने औरंगाबाद- बुलडाणा, जाफ्राबाद-भोकरदन महामार्गावरील वाहतूक बंद आहे. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.