मराठवाड्यात पावसाचा महाप्रताप, पूराचे पाणी गावात शिरल्याने, अनेक गावांचा संपर्क तुटला

7

औरंगाबाद: महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ काही जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून बचावकार्य सुरू झालं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे नदीच्या पुराचे पाणी गावात घुसले. पुराच्या पाण्याचा एवढा मोठा प्रवाह पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला. या प्रवाहात गावातील व्यावसायिकांच्या टपऱ्या वाहून गेल्या. या पाण्याचा वेग एवढा तुफान होता की या व्यावसायिकांच्या या टपऱ्या काही क्षणात, गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेल्या.

बीडच्या परळी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं झोडपून काढलं आहे. नागापूर इथल्या वाण नदीला पूर आला असून परळी बीड हायवे पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे परळी बीड हायवे संपूर्ण ट्राफिक जाम झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे, अंबड- मंठा सह सर्वच तालुक्यात पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळा मध्ये 133 मिली मीटर पाऊस पडल्याने ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. करंजळा येथे गल्हाटी नदीचे पाणी करंजळा गावात शिरल्याने अनेकांचे घरात पाणीच पाणी झाले आहे.

बुलडाण्यात दोघे गेले वाहून

बुलडाणा जिल्ह्यातील नांद्रा कोळी येथे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात 2 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून संततधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. राहुल चौधरी आणि भगवान गोरे असे बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत. नाल्याच्या 100 मीटर अंतरावर त्यांची दुचाकी आढळल्याने हे दोघे जण वाहून गेले असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.