मुंबई विरुद्ध पंजाब, दोघांसाठी करो या मरो, प्ले-ऑफसाठी दोन्ही संघाना सामना जिंकण महत्वाचा

मुंबई: आयपीएलचे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स हा संघ यंदा खेळाडूंच्या खराब फॉर्मशी झगडतोय. आयपीएल 2021 मध्ये या चॅम्पियन संघाची स्थिती सध्या सर्वात वाईट आहे. मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर उभा आहे.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात रोहित शर्माचा हा संघ आज आपला तिसरा सामना खेळणार आहे, ज्यामध्ये मुंबईचा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जशी होणार आहे. राहुलच्या संघाचाही हा तिसरा सामना आहे. पण या दोन संघांमधला मोठा फरक असा आहे की, पंजाब किंग्सने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील मागील 2 सामन्यांपैकी एक जिंकला आहे, तर मुंबई इंडियन्स अद्याप त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. विजयाचा हा शोध आजही संपला नाही, तर मुंबई इंडियन्सचा प्ले-ऑफचा मार्ग जवळपास बंद होईल.

प्लेऑफकडे वाटचाल करण्यासाठी हा सामना जिंकणं पंजाबसाठीदेखील अत्यंत गरजेचं आहे. मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ सध्या 8 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आज अबू धाबीच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्ससाठी अजून एक वाईट गोष्ट म्हणजे आयपीएल 2021 मध्ये खेळलेल्या शेवटच्या सामन्यात पंजाबचा संघ मुंबईविरोधात विजयी झाला होता. त्यामुळे दबाव पूर्णपणे मुंबई आणि रोहितवरच असणार आहे. मागील 5 सामन्यांच्या रिपोर्ट कार्डमध्येही पंजाब किंग्जचा मुंबईवर 3-2 असा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत अनेकदा कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!