विवाहितेचा गळा आवळला, अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचलं; नागपुरात थरारक घटना

नागपूर: चार दिवसांपूर्वी कळमेश्वर तालुक्यातील शेतावर सालगडी म्हणून कामाला लागलेल्या एका आरोपीने त्याच्यासोबतच्या महिला आणि मुलीची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना झुनकी शिवारात सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर पंचक्रोशीत प्रचंड थरार निर्माण झाला. कळमेश्वर – झुनकी मार्गावर श्रावण घोडपागे (रा. नागपूर) यांचे शेत आहे. हे शेत त्यांनी कळमेश्वर येथील ललित गजानन गणोरकर यांना ठेक्याने दिले आहे.

चार दिवसापूर्वी २० ते ३० वयोगटातील महिला आणि तिची राणी नामक मुलगी वय (अंदाजे ८ वर्षे) या दोघींना घेऊन आरोपी राजेश शाहू ललित गणोरकर यांच्याकडे आला. त्याने शेतात काम करायची आणि तेथेच राहायची तयारी दाखविल्याने गणोरकर यांनी त्याला सालगडी म्हणून शेतातील कामावर ठेवून घेतले. शेतातील झोपडीतच राजेश आणि त्याच्यासोबतची महिला आणि मुलगी राहू लागली. दरम्यान, सोमवारी दुपारी ललित गणोरकर हे शेतात आले असता झोपडीमध्ये त्यांना महिला आणि मुलगी मृतावस्थेत आढळून आली. राजेश शाहू मात्र कुठेच दिसला नाही. त्यामुळे गणोरकर यांनी कळमेश्वर पोलिसांना कळविले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावर निरीक्षण केले असता दगड, पावशी आणि दोरी आढळली. प्राथमिक तपासात आरोपीने महिला, मुलीचा गळा आवळून तसेच शस्त्राचे वार करून दगडानेही ठेचल्याचे दिसून आले. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी राजेश शाहूविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.