‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा ‘का’ होतोय विरोध; जाणून घ्या

1

मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. फार कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आता मात्र या मालिकेला प्रेक्षकांचा विरोध होताना दिसतोय. मालिकेत सध्या दाखवण्यात येणाऱ्या कथानकावर प्रेक्षक नाराज आहेत. त्याबाबतीत प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता ही मालिका बंद करा, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, कुठे नेऊन ठेवलीये मालिका माझी, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सध्या मालिकेत दाखवण्यात येत असलेल्या कथेप्रमाणे अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्न होऊनही अरुंधती त्याच घरात राहत आहे. आजी आणि आप्पा यांच्यासाठी अरुंधती तिथे राहत असली तरी प्रेक्षकांना ते पसंत पडलेलं नाही. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणं कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला पसंत पडणार नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. सोबतच अरुंधती वारंवार संजनाला मदत करताना दिसते. तर दुसरीकडे संजना मात्र अनेकदा टोमणे मारत अरुंधतीचा अपमान करताना दिसते. तरीही अरुंधती तिच्या मदतीसाठी धावत जाते. आता ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेवर सुद्धा अरुंधती संजनाची मदत करताना दाखवली आहे.

नेटकरी या गोष्टीवर प्रचंड संतापले आहे. एका युझरने आपलं मत मांडत लिहिलं, ‘असं कुठेही होत नाही. ज्या बाईने आपला २५ वर्षांचा संसार मोडला त्या बाईसोबत एकाच घरात राहणं, तिला मदत करणं, समजून घेणं. हे खऱ्या आयुष्यात घडत नाही.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिच्याबाजूने नक्की लढा द्यावा पण इथे ती बाई चुकीची निवडली आहे. आता अरुंधती सिंगल मदर आहे.’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘स्त्रीवर होणार अन्याय सहन न करण्याचे अरुंधती धडे देतेय. मग गेली २५ वर्ष ती अनिरुद्ध करत असलेला अन्याय का सहन करत होती.’

Get real time updates directly on you device, subscribe now.