अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देता न आलेल्या, शेकडो विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा संधी!

मुंबई: मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच अॅग्रीसाठीच्या सीईटी परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. 200 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असून विद्यार्थ्यांनी आम्हाला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी केली. ही परीक्षा 20 तारखेपासून 1 तारखेपर्यंत सुरू आहे. काल ज्यांचे पेपर होते त्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असून आजही अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.
दरम्यान ज्यांना परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना पु्न्हा दिली जाणार आहे. मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, अशी माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काल आणि आज राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता आल्याने जास्तीचा ताण घेऊ नये, अशी माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही याविषयी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे. राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.