‘फडणवीस यांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यात पूरपरिस्थिती’ – रुपाली चाकणकर

पुणे: राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबरदस्त बसला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’वरून पर्यावरण अभ्यासकांनी टीका केली होती. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यातील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या बाबतीत तज्ज्ञांनी अगोदरच सांगितले सुद्धा होते. मात्र, ‘मीच तो सर्वज्ञ’ अशा स्वभावामुळे राज्यातील हे संकट निर्माण झाले आहे. कोणतेही काम करताना आजच्या सोबतच भविष्याचा विचार करणे, महत्त्वपूर्ण असते.” असे ट्विट करत रुपाली यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनीही मराठवाड्यातील पूरस्थितीच्या कारणांपैकी जलयुक्त शिवार एक कारण असल्याचं म्हटलं आहे. मराठवाड्यात आलेला पूर जलयुक्त शिवार योजनेमुळे आला असं म्हणता येणार नाही, मात्र पूर येण्याला जलयुक्त शिवार योजना हे एक कारण आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामं चुकीच्या पद्धतीने झाली. अतिखोलीकरण ,रुंदीकरण यामुळे कामात तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणावर झाल्या. मी आधीपासूनच या कामांवर आक्षेप घेतला होता. मात्र सरकारने केलेल्या चुकांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं प्रदीप पुरंदरे म्हणाले.

हवामान बदल ,नद्यांची वहनक्षमता कमी झाली, ही कारणं असली तरी पुराचं एक कारण जलयुक्त शिवार योजना हे सुद्धा आहे, असं जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!