अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजारांची मदत द्या; राज ठाकरेंच मुख्यमंत्र्यांना

4

मुंबई: राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबरदस्त बसला आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकात काय म्हटलंय

‘महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.’ ‘अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तात्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीने शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.’

‘प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल, परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.’ असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.