टी 20 वर्ल्डकमध्ये ‘हा’ युवा खेळाडू घेणार जागा; हार्दिक पंड्याचा होणार पत्ता कट

मुंबई: आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असतानाच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या फिटनेस बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीनं पंड्याची फिटेनेस ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. हार्दिक पंड्या सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत असला तरी तो गोलंदाजी करत नाहीये. त्यामुळे भारतीय संघातील त्याच्या समावेशाबाबत आता शंका उपस्थित झाली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या जागी आता नव्या युवा खेळाडूच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसरे सत्र दुबईत सुरू आहे. या सत्रात युवा भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने अनेकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं आहे. यंदाच्या पर्वात दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पदार्पण केलेल्या व्यंकटेश अय्यर यानं जबरदस्त कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फलंदाजीसोबतच व्यंकटेश अय्यरनं गोलंदाजीतही कमाल करुन दाखवली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात व्यंकटेशनं केलेल्या जबरदस्त गोलंदाजीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
व्यंकटेशन अय्यरनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात शिमरन हेटमायर आणि अक्षर पटेल यांना बाद करत सामना पलटवला होता. 4 षटकात त्याने अवघ्या 29 धावा दिल्या होत्या. याशिवाय व्यकंटेश अय्यर हा एक विस्फोटक फलंदाज असल्याने सर्वांच्याच नजरा त्याच्याकडे लागून राहिल्या आहेत. आतापर्यंत व्यंकटेशनं स्थानिक ट्वेन्टी-20 करिअरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानं आतापर्यंत 41 सामन्यांमध्ये 21 बळी घेतले आहेत. तर फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये 7 आणि 24 ए लिस्ट सामन्यांमध्ये 10 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे आपल्या अष्टपैलू कामगिरीनं व्यंकटेशनं भारतीय संघातील हार्दिक पंड्याच्या जागी उत्तम पर्याय असल्याचं दाखवून दिलं आहे.