नगरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना: बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार

अहमदनगर: राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच अहमदनगर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. पीडित 11 वर्षीय चिमुकलीची आई 28 जुलैला काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. त्याचदिवशी रात्री पीडितेच्या पित्याने ती झोपेत असताना तिच्यासोबत गैरप्रकार केला. विशेष म्हणजे आरोपीने त्यानंतरही पुन्हा दोनवेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान आई गावावरुन घरी आल्यानंतर पीडितेने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला.

पीडितेच्या आईची पोलिसात तक्रार

दरम्यान पीडित मुलीने या प्रकरणाची माहिती आपल्या आईला दिली. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (दि. 29) रात्री उशिरा फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.