आंतरराष्ट्रीय हॉकीमधून भारतीय हॉकीपटू रुपिंदरपाल सिंगची निवृत्ती
मुंबई: भारतीय हॉकी संघाचा अनुभवी ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय संघात रुपिंदरने मोलाची भूमिका बजावली होती. ३० वर्षीय रुपिंदरपालने ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
Hi everyone, wanted to share an important announcement with you all. pic.twitter.com/CwLFQ0ZVvj
— Rupinder Pal Singh (@rupinderbob3) September 30, 2021
मी हॉकीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यांचा काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ आहे यात काहीच शंका नाही. १३ वर्षांची माझी ही कारकिर्द मी आता संपवतो आहे. माझ्या सहकाऱ्यांसोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोडीयमवर उभं राहून मेडल स्विकारणं हा क्षण मी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवेन असं रुपिंदरपालने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.
भारतीय हॉकी संघाचा रुपिंदरपाल हा प्रमुख खेळाडू होता. पेनल्टी कॉर्नरवर गोल करणाचा हक्काचा ड्रॅगफ्लिकर म्हणून रुपिंदरपालने २२३ सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. आपल्या तेज गतीसाठी रुपिंदरपाल ओळखला जायचा. रुपिंदरपालच्या निवृत्तीमुळे भारतीय हॉकीला आता ड्रॅगफ्लिकिंग सेक्शनसाठी हरमनप्रीत या तरुण खेळाडूवर अवलंबून रहावं लागणार आहे.