शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमधून शिफ्ट करण्यात आलं आहे.

आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये 4 दिवस उपचार करुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

अडसुळांवर काय आरोप आहे?

‘सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती’, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे.