पंजाबला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आज कोलकाता नाईट रायडर्स  आणि पंजाब किंग्स या दोन संघामध्ये यंदाच्या पर्वातील 45 वा सामना खेळवला जात आहे. प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असताना पंजाब संघाला सामन्यापूर्वीच एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने संपूर्ण आय़पीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे गेलचं मत पोस्ट केलं आहे.

गेलने याबाबतची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली असून तो म्हणाला, “मागील काही महिने मी विविध स्पर्धांसाठी वेगवेगळ्या बायोबबलमधून फिरत आहे. आधी कॅरेबियन प्रीमियर लीग आणि आता आयपीएल. या सर्वामुळे मी मानसिक दृष्टीने फार थकलो आहे. त्यामुळे स्वत:ला रिफ्रेश करुन आगामी टी20 विश्व चषकात वेस्टइंडीज संघाकडून चांगली कामगिरी करण्याकरता स्वत:ला वेळ देत आहे. मी पंजाब किंग्स संघाच धन्यवाद करतो आणि माझ्या सदीच्छा कायम त्यांच्यासोबत असतील.”

गेलच्या पोस्टनंतर पंजाब किंग्सनेही त्याच्या निर्णयाचं समर्थन करताना एक पोस्ट लिहीली. ज्यात त्यांनी म्हटलं, “एक संघ म्हणून आम्ही गेलच्या या निर्णयाला समजून घेऊन त्याला पाठिंबा दर्शवतो आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याला काही मदत हवी असल्यास नक्कीच करण्याची तयारी दर्शवतो. तसंच आमच्याकडून ‘यूनिव्हर्सल बॉस’ ला आगामी टी20 विश्व चषकासाठी शुभेच्छा”